सर्व फ्रँचायझींची नजर रोहित शर्मावर

पुढील वर्षी होणार एक मेगा लिलाव

। मुंबई । वृत्तसंस्था ।

पुढील वर्षी आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. ज्याची संपूर्ण क्रिकेट जग आतुरतेने वाट पाहत आहे. पण दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माला सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत जर महिटमॅन लिलावात उतरला तर त्याच्यावर सर्वाधिक बोली लागणार हे नक्की.

सर्व 10 संघांना रोहितला खरेदी करायला आवडेल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पंजाब किंग्सही या दिग्गज खेळाडूला आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. मात्र, पंजाब किंग्जचे क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर म्हणाले की, रोहितला विकत घेणे हे आमच्याकडे असलेल्या रकमेवर अवलंबून आहे. मेगा लिलाव झाल्यास फ्रँचायझींना संपूर्ण संघ तयार करावा लागेल. संजय बांगर रोहित शर्माबाबत म्हणाले की, जर तो लिलावात दिसला तर त्याच्यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. आम्ही त्याला विकत घेऊ की नाही हे आमच्याकडे किती पैसे आहेत यावर अवलंबून असेल. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवून सर्वांना आश्‍चर्यचकित केले. हिटमॅनने लिलावात भाग घेतला तर 17 वर्षांचा बोलीचा विक्रम मोडीत निघणार हे नक्की. त्याला विकत घेण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतील. रोहित शर्मासाठी 50 कोटी रुपये खर्च करण्यास दोन संघ मालक तयार असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version