। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नाताळ आणि वर्ष अखेरचा मुहूर्त पाहता पर्यटकांचा मोठया प्रमाणावर रायगडच्या पर्यटनस्थळांकडे ओघ सुरु आहे. त्यामुळे रायगडकडे येणारे सारे महामार्ग वाहतुक कोंडीमुळे फुल्ल झाले आहेत. अलिबागपासून ते श्रीवर्धनपर्यंत सर्व समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेेले आहेत. या पार्श्वभुमीवर रायगड पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
रायगड जिल्हा हा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेला आहे. रायगड जिल्हयातील अलिबाग, मांडवा, काशीद, मुरूड, श्रीवर्धन, दिवे आगार अशी समुद्र किनारपटटी असलेली ठिकाणे, खालापुर व कर्जत तालुक्यातील फार्म हाउसेस, थंड हवेचे ठिकाण माथेरान या ठिकाणी मुंबई, पुणे, ठाणे या शहरातून नागरिक मोठया प्रमाणात नववर्ष स्वागतासाठी व पर्यटनासाठी येत असतात.
मुंबई गोवा महामार्गावर पर्यटकांच्या तुडूंब गर्दीमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. माणगाव बसस्थानक ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. कोकणात जाणार्या मार्गावर वाहतूकीची कोंडी निर्माण होऊन पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मुुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर देखील वाहनांच्या मोठ मोठया रांगा अनुभवयास मिळत आहेत. पुण्याकडे जाणार्या मार्गावर देखील खालापूर टोलनजिक वाहनांची रांग लागली आहे.

त्यामुळे यावर्षीही 31 डिसेंबर व ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडुन पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्हयातील सर्व 28 पोलीस ठाण्याकडे विशेष पथके तयार करण्यात आलेली असुन हॉटेल, धाबे, कॉटेज, फार्म हाउस येथे गैरकृत्य होणार नाही याकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे. दारू पिवुन गोंधळ घालणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी पोलीस पथके नेमण्यात आलेली आहेत. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने साध्या वेशातील पोलीस व महिला अंमलदार यांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आलेली आहेत. वाहतुक व्यवस्था सुरळित राहावी म्हणुन जवळपास 86 ठिकाणी 90 वाहतुक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. वाहतूक विभागाकडून महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राईव्ह ची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. रायगड जिल्हयामध्ये पोलीस स्टेशन हददीतील फिक्स पॉईट, पेट्रोलिंग, नाकाबंदी याकरीता एकुण 75 पोलीस अधिकारी, 412 पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.
रायगड जिल्हयात येणा-या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगड पोलीस दल योग्य ती सर्व खबरदारी घेत असुन नागरिकांनी सुध्दा पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.