एस टी आगारात सर्वच कामे अर्धवट

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड एसटी आगारात रस्त्यावर कुठेही बंद पडणार्‍या टुकार आणि गळक्या बस आणून प्रवाशांच्या जीवाशी खेळ मांडणार्‍या एसटी महामंडळा विरोधात मुरूड तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे.

केवळ गाड्याच नव्हे तर डेपोच्या दर्शनी अंतर्गतभागात काँक्रिटीकरण देखील अर्धवट ठेवण्यात आले असून तेथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत आहे. बुधवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी स्वारगेट पुण्याकडे जाणार्‍या बसच्या आसनांची गळतीने दुरावस्था उडालेली असूनही मुरुड आगरातून ही बस लाँग रुट पुण्याकडे सोडण्यात आली. या बसचे दुरुस्तीचे काही काम अलिबाग आगारात करण्यात आले.

पर्यटन क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असणार्‍या मुरुड तालुक्यात पर्यटकांना आणि प्रवाशांना एसटी बस सेवा ही प्रमुख प्रवासी सेवा आहे. या शिवाय रेल्वे किंवा जलमार्गाने थेट अलिबाग किंवा मुंबईकडे जाता येत नाही. तीन-चार महिन्या पूर्वी मुरूड एसटी आगारातील प्रवेशद्वारावरील भागाचे पेव्हर ब्लॉक बसवुन खड्डे बुजविण्यात आले होते. त्याच वेळी वर्क शॉपकडे जाणार्‍या 5 वर्ष प्रलंबित भागाचे रखडलेल्या मार्गाचे काँक्रीटकरण सुरू करण्यात आले; मात्र डाव्या बाजूने काँक्रिटकरण झाल्यावर काम बंद पडले ते अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे उजव्या बाजूला खड्डे पडले असून बसेसना खड्यातुन वर्क शॉपकडे जावे लागत आहे. आगारात हा दुर्दशा उडालेला नजारा विक्षिप्त ठरत आहे. मुरूड पद्मजलदुर्ग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी सांगितले की बुधवारी रोजी सकाळी मुरूड ते पुणे ही बस स्वारगेटकडे सोडण्यात आली. ही बस अस्वच्छ होती. सीटवर घाण असल्याने कपडे खराब झाले. समान ठेवण्याच्या डोक्यावरील रॅक देखील तुटून पडण्याची शक्यता दिसून आली. वायपर देखील काम करीत नव्हते.

दरम्यान, प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागल्याची तक्रार अरविंद गायकर यांनी त्वरित विभागीय व्यवस्थापक पेण यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी गाडी आगरात येताच आवश्यक दुरुस्ती तातडीने करू आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही, असे आश्‍वासन दिले.

Exit mobile version