रेवदंड्यातील ग्रामसेवकांचाही समावेश असल्याचा आरोप
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मालमत्ता मुल्यांकन क्रमांक चुकीचा देऊन आपल्या जागेवर अतिक्रमण करण्याबरोबरच भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुंबईतील रहिवासी संकेत पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती अर्जात केली आहे. रेवदंडा ग्रामपंचायतीवर शिंदे गटातील सरपंच आहे. सरपंचसह काही सदस्यांचा हा प्रताप उघड करण्यात आला असून, यामध्ये ग्रामसेवकांचादेखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. अनेकवेळा अर्ज करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबई येथील संकेत पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,अलिबाग तालुक्यातील पालव येथील सिटी सर्व्हे क्रमांक 214/1/14 मधील घर क्रमांक 3308 (असेसमेंट) असलेल्या जागेत आशा दामोदर पाटील यांना ग्रामपंचायतीने असेसमेंट क्रमांक 2247 दिल्यामुळे त्यांच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे.याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही योग्य ती दखल घेण्यात आली नाही.
अर्जदारांनी याबाबत ग्रामपंचायतीसह जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, आणि तहसिलदार आदी कार्यालयांमध्ये 24 मे ते 29 सप्टेंबर या कालावधीत अनेक वेळा अर्ज केले आहेत. ग्रामसेवक प्रसाद गोंधळी (अतिरीक्त पदभार) आणि तत्कालिन ग्रामसेवक नितेश तेलगे यांच्या बद्दल पाटील यांचा आरोप असा आहे की, तत्कालिन ग्रामसेवक नितेश तेलगे यांनी चुकीचा असेसमेंट दिल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी सुरू करावी. विद्यमान ग्रामसेवक प्रसाद गोंधळी यांनी आशा दामोदर पाटील यांच्या असेसमेंट क्रमांक 2247 संबंधित मूळ कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप आहे.
ग्रामसेवक गोंधळी यांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी देखील या प्रकरणाबाबत मूग गिळून गप्प असल्याचाही आरोप आहे.
सरपंच आणि उपसरपंच व अन्य सदस्य ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत कामकाज करण्याऐवजी फक्त चहापान करण्यासाठी येत असल्याचा आणि त्यांना कामकाजाचे कोणतेही ज्ञान नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आशा दामोदर पाटील यांच्यासोबत सरपंच, उपसरपंच व अन्य सदस्यांची आर्थिक देवाण घेवाण झाल्याची दाट शक्यता आहे. केलेल्या कारवाई तक्रारी न करता भ्रष्ट केलेल्या कामावर पडदा टाकण्याचे काम करीत असल्याचा संशय संकेत पाटील यांनी केला आहे. शिंदे गटातील सरपंचांसह अन्य सदस्य, ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी यांच्यामध्ये आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या भ्रष्ट कारभाराबाबत दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.






