विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव
| रेवदंडा | प्रतिनिधी |
आगरी समाजाची भाषा, परंपरा आणि संस्कृती यांचा संगम घडवणारा अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचा साहित्य संगम सोहळा मांडला ता. मुरुड येथील ग्रीन किंग रिसॉर्ट येथे शेकडो साहित्यिक व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडला.
आगरी समाज श्रम, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन आगरी समाज हा परंपरेने समुद्राशी, श्रमाशी आणि मातीतल्या गंधाशी जोडलेला आहे. समुद्रकिनारी शेती, मासेमारी, मीठउद्योग, नारळ-काजू शेती या सर्व जीवनशैलीने आगरी संस्कृती घडवली आहे. या समाजाची कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा आणि सांस्कृतिक अभिमान ही वैशिष्ट्ये आजही तितकीच तेजस्वी आहेत. त्यांची भवर नृत्य, लोकगीते आणि आगरी बोलीची गोडी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात अमूल्य ठेवा म्हणून ओळखली जाते. या परंपरेला साहित्यिकांचा बळकट हातभार लाभत असल्याने आगरी समाजाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत आहे. या भव्य सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले की आगरी अस्मिता अमर आहे. साहित्य, संस्कृती आणि समाजकार्य यांचा संगमच आगरी समाजाला बलशाली बनला आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक अमृत पाटील यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये अलिबाग नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, कैलास पिंगळे, सुरेश भोपी, चंद्रकांत पाटील, मिलिंद खारपाटील, ॲड. राकेश पाटील, धम्मशील सावंत आदी मान्यवरांचा समावेश होता. सांस्कृतिक गोडवा आणि सन्मानाने कार्यक्रमाची सुरुवात वावे ग्रामस्थांच्या गायनाने आणि भवर नृत्याने झाली. आगरी समाजाची सांस्कृतिक परंपरा यातून उलगडून दिसली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक सुरेश भोपी, कृष्णा जोशी, मारुती बागडे, अरुण द. म्हात्रे, प्रा. संदेश पाटील, जयंत पाटील, विकास पाटील, चंद्रकांत कांडपिले यांचा समावेश होता. या सोहळ्यात नंदेश गावंड लिखित आगरासत्र या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गावंड यांनी केले. शेवटी भजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
तुम्ही उच्चशिक्षित व्हा आणि तुमच्या साहित्यामधून समाजापर्यंत समृद्ध विचार पोहोचवा. आगरी साहित्य दालन दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत राहावे, हेच आमचे अपेक्षित ध्येय आहे.
ॲड. मानसी म्हात्रे





