पेणमधील राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनात अनुपस्थिती; समाजबांधवांत नाराजी
| पेण | प्रतिनिधी |
पेण येथे अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची जोरदार घोषणा करण्यात आली होती. शहरभर बॅनरबाजी, स्वागत फलक आणि प्रसिद्धी मोहिमेद्वारे मुख्यमंत्री येणार असल्याचे वातावरण तयार करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने आगरी समाजामध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे.
“आमंत्रण दिले, प्रसिद्धी केली, अपेक्षा निर्माण केल्या; मात्र शेवटच्या क्षणी पाठ फिरवली,” अशा संतप्त प्रतिक्रिया समाजबांधवांतून उमटत असून, आगरी समाजाच्या भावना दुखावल्याची चर्चा आता पेण शहरात रंगू लागली आहे.
दरम्यान, पेण नगरपालिकेच्या वरच्या मैदानावर पार पडलेले राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन भक्ती, संस्कृती आणि समाजएकतेचा भव्य संगम ठरले. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्या आयोजनाखाली झालेल्या या सोहळ्यात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.
सकाळी भव्य आध्यात्मिक दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. परमपूज्य सदानंद महाराज तुंगारेश्वर आणि पुरुषोत्तमानंद पुरी महास्वामी यांच्या उपस्थितीत टाळ-मृदंग, हरिनामाच्या गजरात पेण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. यानंतर महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक, पेणचे आमदार रवीशेठ पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, नगराध्यक्षा प्रितम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
संमेलनात अध्यात्म, संस्कृती आणि समाजएकतेचा संदेश देणारे विविध कार्यक्रम पार पडले. भजन, धवले गायन, भक्तिगीते तसेच आगरी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनी सादर केलेल्या आगरी स्मृती गीताने वातावरण भारावून गेले.
वनमंत्री गणेश नाईक यांनी मनोगतात अध्यात्म आणि जीवनमूल्यांचा संबंध अधोरेखित केला, तर आमदार रवीशेठ पाटील यांनी आगरी समाजाच्या इतिहासाचा गौरवपूर्ण उल्लेख करत समाजाने एकत्र राहण्याचे आवाहन केले. यावेळी ‘वारी देवाची’ या विशेष अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यात्म, संस्कृती आणि समाजप्रेमाचा संदेश देणारे हे संमेलन आगरी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरले.







