टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समिती आक्रमक
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षानुवर्षे रखडलेले, अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, टोलवसुली मात्र वेळेवर आणि पूर्ण करण्यात येत आहे. या विसंगतीविरोधात आता कोकणात संतापाची लाट उसळली आहे. खड्डे, धोकादायक वळणे, अपूर्ण पूल, अर्धवट सेवा रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या छायेत प्रवास करणाऱ्या नागरिकांनी ‘रस्ता अपूर्ण असेल तर टोल कशाचा?’ असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
याच मुद्द्यावरून जनआक्रोश समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. सुकेळी खिंड आणि पनवेल येथील टोलवसुलीसह महामार्गावरील अपूर्ण कामे आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला जाणार आहे.
वाहनचालक टोल भरतात, मात्र पुढे त्यांना खड्डे, धोकादायक डायव्हर्शन, अपूर्ण बांधकाम आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ‘जनतेकडून पैसा पूर्ण घेतला जातो, मग रस्ता अर्धवट का?’ असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. खा. सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न मांडला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. आता आश्वासनांपेक्षा कामाची ठोस कालमर्यादा आणि प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.
महामार्ग पूर्ण होण्यापूर्वी सुरू असलेल्या टोलवसुलीची कायदेशीरता तपासावी, अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनहित याचिकेत केली जाणार आहे.
दरम्यान, 9 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या कानावरही मुंबई-गोवा महामार्ग आणि टोलवसुलीचा प्रश्न घालण्यात येणार आहे.
आमचा टोलला विरोध नाही; अपूर्ण आणि धोकादायक रस्त्यासाठी टोलला विरोध आहे. आधी महामार्ग पूर्ण करा, प्रवाशांना सुरक्षित करा आणि मगच टोल घ्या! अशी संतत्प मागणी करण्यात येत आहे.





