कामे न करताच बिले काढण्याचा प्रकार उघड; ठेकेदारासह अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कुर्डूस येथील शिवाजीनगर येथे पाणीपुरवठा योजनेची कामे न करताच बिले काढण्यात आल्याचा आरोप आत्माराम पाटील यांनी केला आहे. काम केल्याचे खोटे पुरावे दाखवून लाखो रुपयांची लूट करण्यात आली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये सहभागी असणारे ठेकेदार, संबंधित विभागाचे अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आत्माराम पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील कुर्डूस येथील शिवाजीनगर येथे पाणीपुरवठा योजना 2024 मध्ये मंजूर करण्यात आली होती. 14 मार्च 2024 मध्ये या योजनेचा कार्यारंभ झाला. ठेकेदार आदर्श कार्लेकर यांना या कामाचा ठेका देण्यात आला. एमआयडीसी ते विठ्ठल मंदिर शेजारी इएसआर पम्पिंग मशिनरी बसविणे, पाईपलाईन टाकणे, पाण्याची टाकी उभारणे, फिल्टर प्लॅट बांधणे ही कामे होती. परंतु, ठेकेदाराने कोणतीहीच कामे न करता, कामे केलेली खोटी कागदपत्रे दाखवून कामे केल्याची बिले काढली आहेत. लाखो रुपयांची लूट ठेकेदाराने करून शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप ग्रामस्थ मंडळ शिवाजी नगरच्या वतीने आत्माराम पाटील यांनी केला आहे. कुर्डूसमधील शिवाजीनगर परिसरात कामाची कोणतीही सुरुवात झाली नसताना, ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे दाखवून 8 ऑक्टोबर 2024 मध्ये आठ लाख 50 हजार रुपयांची वसूली केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई, तसेच तक्रारदारांना माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचादेखील सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामस्थांना पाण्यावाचून तडफडत ठेवून खोटी कागदपत्रे तयार करून ठेकेदाराला देयक देण्यात आले आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठेकेदारांसह कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात पोलीसांत तक्रार केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला, असता होऊ शकला नाही.
कुर्डूस येथील शिवाजी नगरमधील पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. आतापर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. निधीअभावी काही कामे थांबली आहेत. उर्वरित कामे प्रगती पथावर असून ती लवकरच पूर्ण होतील. या कामात कोणताही भ्रष्टाचार केला नाही. इस्टीमेंटपेक्षा अधिक काम केले आहे.
– आदर्श कार्लेकर, ठेकेदार
