प्रजासत्ताक दिन साजरा न केल्याचा आरोप

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय कार्यक्रम नियमानुसार साजरा करण्यात आला नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ सचिन जगन्नाथ पाटील यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व प्रशासकांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिन हा देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि संविधानिक मूल्यांशी निगडित राष्ट्रीय दिवस आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरही ध्वजारोहणासह आवश्यक शासकीय कार्यक्रमांचे आयोजन अपेक्षित असते. मात्र, कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाबाबत प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली नसल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणात केवळ तोंडी चौकशी न करता ग्रामपंचायतीचे अधिकृत अभिलेख तपासण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासंदर्भातील ठराव, आदेश, उपस्थिती नोंद, ध्वजारोहणाची नोंद, उपलब्ध छायाचित्रे व व्हिडिओ तसेच कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाची बिले व व्हाउचर तपासावीत, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दोष आढळल्यास कारवाईची मागणी
ग्रामसेवक किंवा प्रशासक यांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन झाले नसेल तर संबंधितांची जबाबदारी निश्चित करून शासनाच्या नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सचिन पाटील यांनी केली आहे. तसेच, चौकशीचा निष्कर्ष आणि त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून या आरोपांबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाला होता की नाही, तसेच त्यासंदर्भातील अधिकृत नोंदी काय आहेत, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
Exit mobile version