शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार; सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात
| अलिबाग | प्रतिनिधी |
![](http://krushival.in/grygrars/2023/12/IMG-20231207-WA0028-1024x472.jpg)
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने एकदरा येथे सायकल व चष्मे वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित केला होता. दोनशेहून अधिक नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देण्यात आले. तसेच 23 मुलींना सायकल वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात मिळाल्याने ग्रामस्थ, महिला वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
मुरुड शहरापासून एकदरा गाव दूर आहे. येथील मुलींना शाळेत जाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेत सायकल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी 23 मुलींना मोफत सायकल देण्यात आल्या. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद फुलला.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना चष्मे विकत घेणे परवडत नाही. चित्रलेखा पाटील यांनी गोरगरीबांसाठी नेत्र तपासणीसह मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेतला. दोनशेहून अधिक नागरिकांनी या शिबीरात सहभाग घेऊन डोळ्यांची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना नंबरनुसार चष्मे देण्यात आले.
28 जणांची होणार मोफत शस्त्रक्रिया
एकदरा येथे गुरुवारी 7 डिसेंबर रोजी नेत्र तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 28 जणांना मोतिबिंदू असल्याचे समजले. त्यांच्यावर लवकरच मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात येणार आहेत.