मतदान कर्मचार्‍यांचा भत्ता रोखीनेच

ऑनलाइन वाटपाची यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न

। रायगड । प्रतिनिधी ।

मतदान प्रक्रियेत भाग घेणार्‍या कर्मचार्‍यांना निवडणूक भत्ता तात्काळ मिळावा, यासाठी पीपीएमएस (पोलिंग पर्सोनेल मॅनेजमेंट सिस्टीम) या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑनलाइन रक्कम पाठवण्यात येणार होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये याची चाचपणी सोमवारी (दि.18) घेण्यात आली. त्यानुसार इतर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे; परंतु रायगड जिल्ह्यात ही सिस्टीम वापरण्यात येणार नसल्याने जिल्ह्यातील 17 हजार 497 निवडणूक कर्मचार्‍यांना सुविधेचा लाभ मिळणार नाही, त्यांना रोखीने भत्ता देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

निवडणुका झाल्यानंतर अनेक दिवस भत्ता मिळाला नसल्याच्या तक्रारी कर्मचार्‍यांच्या असायच्या. या समस्येवर मात करण्यासाठी ऑनलाइन भत्ता वाटपाची यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचा आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर एक केंद्रप्रमुख व इतर चार कर्मचारी काम करतात. या कर्मचार्‍यांना निवडणूक भत्ता, आहार भत्ता देण्यात येतो. लोकसभा निवडणुकीपर्यंत हा भत्ता रोखीने देण्यात येत होता, मात्र विधानसभा निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असून, त्याबाबतचे पत्र उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी के. सूर्यकृष्णमूर्ती यांच्या सहीने राज्यातील सर्व निवडणूक अधिकार्‍यांना पाठविण्यात आले आहे.

जेवणाचा वेगळा भत्ता
निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक कर्मचार्‍यांना वेगळा दैनिक भत्ता आहे. या व्यतिरिक्त प्रतिदिन दोन वेळचा जेवण भत्ता 150 रुपयांप्रमाणे मिळतो. प्रशिक्षण काळात जेवणाची व्यवस्था केली जाते. मतदानाच्या दिवशी व आदल्या दिवशीच जेवणाचा भत्ता दिला जातो. ग्रामीण भागात मतदान प्रक्रियेसाठी जाणार्‍या कर्मचार्‍यांना जेवण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गावचे पोलिस पाटील यांच्यावर असते. दोन दिवस जेवण, चहापाणी तयार करून देणार्‍यास हे कर्मचारी पैसे देतात.

मतदान केंद्रातील कार्याचा आढावापद –

पदभत्ता (रु.)दिवस
केंद्राध्यक्ष 3504
सहाय्यक केंद्राध्यक्ष2504
मतदान अधिकारी2504
मतदान अधिकारी2504
वर्ग चार कर्मचारी2002
पोलीस कर्मचारी2502
आशा कर्मचारी2001
स्वयंसेवक2001
सूक्ष्म निरीक्षक10001

निवडणूक भत्ता देण्याची सुविधा रायगड जिल्ह्यातील कर्मचार्‍यांना मिळणार नाही. ही सुविधा उपलब्ध होण्यापूर्वीच कर्मचार्‍यांच्या बँक खात्याची माहिती बँकांना देण्यात आली आहे. पूर्वीच्याच पद्धतीने त्यांना निवडणूक भत्ता मिळणार आहे. त्याचबरोबर निवडणूक भत्त्यामध्येही बदल झालेले नाहीत.

– नितीन वाघमारे, निवडणूक अधिकारी

Exit mobile version