। उरण । वार्ताहर ।
विधानसभा निवडणूक प्रक्रियेत काम करणार्या शासकीय कर्मचार्यांना अद्यापपर्यंत निवडणूक भत्ता मिळाला नाही. उरण विधानसभा निवडणूक होऊन 3 वर्षांचा अवधी उलटूनही निवडणूक भत्ता कधी मिळेल या प्रतीक्षेत कर्मचारी वर्ग आहे. शासनाकडून निवडणूक प्रक्रियेत शासकीय कर्मचार्यांना लावले जाते. या कर्मचारी वर्गाकडून कोणतीही निवडणूक असो त्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होऊन ती संपेपर्यंत कर्मचारी वर्गाना काम करावे लागत असते. कर्मचार्यांना या सेवेचा भत्ता मिळत असतो.
लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीतील भत्ता कर्मचार्यांना मिळाला आहे. परंतु विधानसभा निवडणूक होऊन आज तीन वर्षांचा अवधी होण्यास आला तरी उरण विधानसभा निवडणुक प्रक्रियेत काम करणार्या शासकीय कर्मचार्यांना अद्याप पर्यंत काम केल्याचा भत्ता मिळालेला नाही. यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर निघत आहे. अशाप्रकारे काम करूनही भत्ता मिळत नसेल तर पुढे होणार्या निवडणूक प्रक्रियेतील कामावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत कर्मचारी वर्ग आहे. याबाबत कर्मचारी वर्गानी वरिष्ठ अधिकारी वर्गाशी संपर्क साधला असता त्यांनी भत्ता कधी पाठविला असल्याचे सांगितले. मग आम्हांला भत्ता का मिळत नाही असा सवाल कर्मचारी वर्गाकडून करून ते उरण विधानसभा निवडणूक प्रकियेत काम केले त्याचा भत्ता कधी मिळेल या प्रतीक्षेत आहेत.