सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ते अलिबाग मार्गावरील आक्षी-रायवाडी येथील 360 मीटरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद करून पर्यायी मार्ग म्हणून सहाणमार्गे नागाव-पाल्हे पुलावरून सुरु केली आहे. मात्र, हा पूल कमकुवत असून, झुडपांनी विळखा घातलेला आहे. पुलाला भगदाड पडलेले असतानादेखील या पुलावरून अवजड वाहनांसह अन्य वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अजब कारभारामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील रायवाडी परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रलंबित होते. 360 मीटर लांबीच्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा सुरु केले असून, या कामासाठी सुमारे 25 लाखांहून अधिक निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.
या प्रलंबित रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम पुन्हा नव्याने सुरु झाल्याने वाहतूक बंद करून पर्यायी वाहतूक पाल्हे पुलावरून सुरु केली आहे. मात्र, हा पूल गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झाला आहे. या पुलाची वारंवार डागडुजी करण्यात आली आहे. या पुलाचे कठडे खराब झाले असून, पुलाला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. या पुलावरून अवजड वाहनांना सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवेश बंद केला होता. परंतु, आता पुन्हा हा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. धोकादायक पुलामुळे प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रायवाडी येथील रस्त्याचे काम सुरू आहे. महिन्याभरात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून सहाण बायपास नागाव-पाल्हे पुलावरून वाहतूक सुरु केली. नागाव-पाल्हे येथील पूल जीर्ण झाला आहे. त्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. सध्या या पुलावरून 12 टनाची वाहने जाऊ शकतात. काही प्रमाणात पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. पूल कमकुवत असल्यामुळे धोक्याची सूचना देणारा फलकही लावला आहे.
जे.ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग