। मुंबई । वृत्तसंस्था ।
निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुढील निर्णय येईपर्यंत उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला धनुष्यबाण या चिन्हाचा वापर करता येणार नाही. तसेच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच मिळत असलेल्या माहितीप्रमाणे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी दोन्ही गटाला तीन चिन्हांची निवड करून ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागणार आहेत.
ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्हाबाबत तीन पर्याय देण्यात येणार आहेत. त्यामध्ये त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश असणार आहे. तसेच ठाकरेंनी मागितलेली नावे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हि आहेत.
दरम्यान, शिंदे गटापुढे तलवार या निवडणूक चिन्हाचा पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच शिंदे गटानेही ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ या नावावर दावा सांगितला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांनुसार, ‘शिवसेना’ हे नाव ठाकरे आणि शिंदे दोघांनाही वापरता येणार नाही. त्याऐवजी हे दोघे ‘शिवसेना’ आणि इतर काही असं नाव वापरू शकतात. म्हणजे शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट – अशा पद्धतीने इतर नावं हे दोन्ही गट वापरू शकतात.