याकूबच्या चुलतभावासोबत फडणवीस आणि राज्यपालही!

भाजपने केलेल्या आरोपांना शिवसेना-काँग्रेसचे प्रत्युत्तर

। मुंबई । वृत्तसंस्था ।

याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीसाठी टायगर मेमनच्या नावाची धमकी देणाऱ्या रऊफ मेमनसोबतच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या किशोरी पेडणेकरांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी रऊफ मेमन आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. आरोप करणाऱ्या भाजपच्या बारा तोंडांनी या फोटोला कॅप्शन द्यावे खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर, काँग्रेसने रऊफ मेमन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो ट्वीट केला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. बडा कब्रस्तानच्या ट्रस्टींना टायगर मेमनच्या नावाने धमकी देण्यात आली. त्याची तक्रार करण्यात आली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ट्रस्टींनी अल्पसंख्याक मंत्री म्हणून नवाब मलिक यांच्याकडे तक्रार केली. मात्र, त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. याकूब मेमनची कबर सजवण्यासाठी दुबईवरून आदेश आले. मात्र, नवाब मलिक यांचे दाऊदशी असलेले संबंधांमुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तर, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणात कोणतेही चौकशीचे आदेश दिले असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि मेमन कुटुंबियांशी असलेल्या संबंधांची चौकशीची मागणी भातखळकर यांनी केली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि रऊफ मेमन याचा फोटो ट्वीट केला. भारतीय जनता पार्टीच्या बारा तोंडाने दुसऱ्यावर आरोप करणाऱ्यांनी या फोटोवर कॅप्शन द्यावे असे टोलाही त्यांनी लगावला. किशोरी पेडणेकर यांनी ट्वीट केलेल्या फोटोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील दिसत आहेत.

तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि रऊफ मेमन यांचा फोटो शेअर करत सावंत यांनी ‘रऊफ मेमन ते हेच का?’ असा प्रश्न केला आहे.

Exit mobile version