भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची मागणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीत पात्र ठरविण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत असणारा लिपीक प्रदीप ढोबाळ याने पैशाची मागणी (खंडणी) केली असल्याने ढोबाळ याच्यासहित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांचीसुद्धा कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अमूलकुमार भलगट यांनी केली असून, यासंदर्भात आरोग्य संचालक यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीत पात्र ठरविण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत असणारा लिपीक प्रदीप ढोबाळ याने पैशाची मागणी (खंडणी) केली असल्याने त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ढोबळ याला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे. प्रदीप ढोबाळ याने भावी पोलीस कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणीत पात्र ठरण्यासाठी पैशाची मागणी केली असून, त्याच्याकडून एकवीस हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपी ढोबाळ याने हे पैसे कोणाच्या आदेशाने घेतलेत याचीही कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.