माणगावचे ट्रॉमा केअर सेंटर कागदावरच

अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणार्‍या जीवनवाहिनीसाठी पुढचे पाऊल कधी ?
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाली असली तरी अद्यापही सेंटर कागदवरच राहिले असून हे सेंटर उभारणीसाठी शासन एक पाऊल पुढे कधी टाकणार असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे.

महामार्गावरील माणगाव उपजिल्हा रुग्णालय हे दिवसेंदिवस अपडेट होत असून महामार्गावरील अपघातग्रस्तांवर उपचार करण्यापासून ते विविध आजारावरील रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज झाले आहे. सामान्य नागरिकांना खाजगी – महागडी रुग्णसेवा परवडत नसल्याने दक्षिण रायगडसह नजीकच्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून अनेक रुग्ण माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. नवनवीन उपचारासाठी लागणार्‍या यंत्रसामुगी, पुरेसा ऑक्सिजन साठा, डायलेसिस विभाग, यामुळे हे रुग्णालय कात टाकत असून लवकरच नवीन सिटीस्कॅन मशीन मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत आणखी एक भर पडणार असून माणगावची आरोग्य यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरमुळे अधिक बळकट होईल असा दावा केला जात आहे.

या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रस्त्यावरील अपघातग्रस्त रुग्णावर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचणार आहेत. मात्र या ट्रॉमा केअर सेंटरला 10 महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली असून ते आजही कागदावरच राहिले आहे. या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीला मुहूर्त कधी सापडणार हा प्रश्‍नच उभारला आहे. माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालय हे विविध रुग्णांच्या आजारावर व शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक विभाग सज्ज आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील अपघात ग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सिटीस्कॅन मशीनची गरज आहे. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटरची ही फार मोठी गरज भासत होती.

कोकणवासियांना उपयुक्त
महामार्गावरील हे महत्वाचे ठिकाण असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, दापोली तसेच विविध तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी येथे येतात. शिवाय दक्षिण रायगड मधील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, पाली येथूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. ट्रॉमा केअर सेंटर व सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित झाल्यास माणगावात रुग्णावर निदान व उपचार होऊन त्या रुग्णांचे प्राण वाचून जीवदान मिळेल. अशी अशा नागरिकांना वाटत आहे.

विविध उपचार होणार
माणगाव उपजिल्हा रूग्णालयालगत हे ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार असून तेथे 25 ते 30 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. असे शासनांनी 10 महिन्यापूर्वी जाहीर केले होते. या ठिकाणी अस्थिरोग तज्ञ व त्याला लागणारा पुरेसा कर्मचारी वर्ग, एक्सरे सुविधा, हाडाचे ऑपरेशन करण्यासाठी सुविधा असणार आहे. याच रुग्णालयात ऑक्सिजन प्लँन्ट उभारल्यामुळे रुग्णांना याचाही लाभ होणार आहे. लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यानुसार रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या माणगाव येथे ट्रॉमा केअर यूनिट उभारणे गरजेचे होते. कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पुणे-ताम्हिणी-माणगाव-दिघी हा राष्ट्रीय महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग अशा महत्त्वाच्या वाहतुकीचे केंद्र म्हणून माणगाव तालुका महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील औद्योगिकीकरण व पर्यटन यामुळे या भागातील नागरिकीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहतुकीदरम्यान होणारे रस्ते अपघात, औद्योगिक क्षेत्रातील अपघात, महापूर, चक्रिवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढत असल्याचे दिसून येते. वातावरणीय बदलांमुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती, रस्ते अपघाताप्रसंगी रुग्णांच्या बचावासाठी अतिमहत्त्वाच्या कालावधीत अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळण्यासाठी ट्रॉमा केअर युनिट जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत असणे गरजेचे आहे.

Exit mobile version