| माणगाव | प्रतिनिधी |
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द विद्यालयात इयत्ता दहावी बॅच 2003-04 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. मुंबई, घाटकोपर, वसई, नालासोपारा, चेंबूर, डोंबिवली आदी ठिकाणांहून मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी व समाजसेवक किशोर शिंदे तर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे हे होते. 21 वर्षांपूर्वी शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या जुन्या शालेय आठवणींना उजाळा देण्याचा सुखद अनुभव मिळाला. जुन्या बेंचवर बसण्याचा आनंद, त्यावेळचे इंग्रजी शिक्षक सुर्वे यांच्या हातून प्रतिकात्मक ‘छडी’ घेण्याची मजा यांनी वातावरणात आनंद निर्माण केला. डिजिटल सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय आणि संगणक कक्ष पाहून माजी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. मैदानावर खेळलेला खो-खोचा खेळ विशेष आकर्षण ठरला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केली होती. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेचे आणि जुन्या शिक्षकांचे कौतुक केले. त्या काळातील शिक्षकांचा शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शाळेतून घडलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी मिलिंद तांबडे (भानंग कोन्ड), उद्योजक मुंबई यांनी शाळेच्या वॉल कंपाऊंडसाठी आर्थिक मदत जाहीर केली. दहावीच्या बॅचनेही या उपक्रमासाठी निधी दिला. अध्यक्षीय भाषणात सुर्वे यांनी सेवानिवृत्ती जवळ आली असली तरी संस्थेच्या मार्गदर्शनाने व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने वॉल कंपाऊंडचे काम पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर निलेश रेवगडे तसेच शालेय समितीचे अध्यक्ष किशोर अल्हाट यांनी शुभेच्छा दिल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक गावित यांनी केले. सूत्रसंचालन सिद्धी पतारे व विशाखा नटे यांनी केले. संगीत विभागाच्या वतीने सिद्धेश घाग यांच्या मदतीने ईशस्तवन, स्वागतगीत सादर करण्यात आले.







