। रोहा । प्रतिनिधी ।
को.ए.सो. मेहेंदळे हायस्कूलच्या दहावीच्या 1997-98 च्या बॅचने कोरोनाच्या रुग्णांना मदत म्हणून काही निधी जमा केला. पण, सुदैवाने ही प्रोसेस सुरू असतानाच कोरोनाचा प्रभाव ओसरू लागला. आता प्रश्न पडला होता, की या जमा निधीचं करायचं काय? शेवटी कोलाडजवळील संभे गावातील काळकाई वृद्धाश्रमाला हॉस्पीटल बेडची मदत करण्याचे ठरवले. सगळ्यांनाच ती कल्पना आवडली.
रविवार, 3 एप्रिल रोजी सकाळी काळकाई वृद्धाश्रमात एका छोटेखानी कार्यक्रमात हे हॉस्पीटल बेड आश्रमाला सुपूर्द करण्यात आले. यावेळी 1997-98 च्या बॅचपैकी अनेक विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेतर्फे सुनंदा मोहिते यांनी सर्वांचे स्वागत केले.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी आश्रमातील वृद्धांची आस्थेने चौकशी केली. त्याचवेळी ग्रुपमधील एक सदस्य आणि अपंग संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी देखील त्यांच्या संस्थेतर्फे वृद्धाश्रमातील अपंग असणार्या वृद्धांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी प्रशांत देशमुख यांनी केले, तर डॉ. मनीष वैरागी यांनी सदर उपक्रमामागचा ग्रुपचा हेतू विशद केला. शेवटी काळकाई वृद्धाश्रमाच्या संचालिका सुनंदा मोहिते यांनी आभार प्रदर्शन केले. हा उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने भूषण देशपांडे, भालचंद्र पवार, प्रांजली थोरे यांनी मेहनत घेतली.