सासवने डी.एड.च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

| अलिबाग | प्रतिनिधी |

मांडला इथे निसर्गरम्य परिसरात पिंगळे सिटीच्या ग्रीन किंग रिसॉर्टमध्ये सासवने डी.एड. कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.

प्रारंभी दीप प्रज्ज्वलन झाले. वि.कृ. म्हात्रे यांच्या टीमने महाराष्ट्र गीत सादर केले. सुरेखा वालेकर यांनी सगळ्यांचे स्वागत केले. ग.सी. म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित सर्व भगिनी बांधवांनी आपापले अनुभव कथन केले. शेखर पिंगळे यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनावर मोहिनी घालून गेला, तर मारुती बागडे यांनी सादर केलेले कॅसिओवादन सर्वांना आनंदाच्या शिखरावर घेऊन गेले. जीवनात उल्लेखनीय कार्य करणार्‍या कैलास पिंगळे, मारुती बागडे, ग.सी. म्हात्रे, शंकर सवादकर, दि.रा. पाटील यांना शाल व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या दुसर्‍या सत्रात शोभना पाटील यांच्या टीमने आरोग्य तपासणी केली. डॉक्टर मंथन व अमित पाटील याने सर्वांना आरोग्याच्या टिप्स दिल्या. आहार कधी कोणते घ्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर संध्याकाळी फणसाड धरणावर पर्यटन करुन नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. रात्री समूह भोजन पार पडले. मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. कुणी कविता सादर केल्या, तर कुणी आपल्या महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. रमेश तांडेल यांनी बनवलेल्या सुग्रास भोजनाचा स्वाद घेतला. भा.य. पाटील यांनी आभार मानले. ज्ञानेश्‍वर गावंड, बाबासाहेब ठोंबरे, जावळे, प्रदीप केणी, रमेश पाटील या सर्वांनी स्नेहसंमेलन यशस्वी व्हावे म्हणून परिश्रम घेतले.

Exit mobile version