माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूलमधील इयत्ता दहावीमध्ये सन 1980-81 या शैक्षणिक वर्षात असणार्‍या माजी शालेय विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नांदगाव येथील दुर्वा सी बीच रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी या बॅचमधील विद्यार्थी एकत्र झाले होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय दिनाच्या आठवणी उजागर केल्या.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने भरत घोसाळकर यांनी केली. स्वागत गीत नरेंद्र चोरघे व महाराष्ट्र गीत सदानंद मुंबईकर यांनी सादर केले. प्रास्ताविक स्वागत अनंत कमाने यांनी केले. 12 दिवंगत माजी विद्यार्थी मित्र व मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 44 वर्षांनी भेट होत असल्याने उपस्थित मित्र व मैत्रिणींमध्ये उत्साह आणि आनंद ओसंडून वाहात होता. अशा कार्यक्रमांनी प्रत्येकाला जगण्याची संजीवनी प्राप्त होईल, आयुष्यमान वाढेल, असे मनोगतात अनंत कमाने यांनी सांगितले. सर्व विषय व शिक्षकांची सांगड घालत नरेंद्र चोरघे यांनी सुंदर गीत रचना सादर केली.

मंजुम मुल्ला उपसरपंच झाल्याबद्दल, रवींद्र विरकुड एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाल्याने व रमेश दिवेकर हे सरपंच असताना ग्रामपंचायतीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या हस्ते सत्कार झाला याबद्दल तसेच कृष्णा अंबाजी यांची सह जीवन विद्या मंडळ पंचक्रोशीत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल या सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत कमाने यांनी केले. दरम्यान, श्याम कोतवाल, प्रितीमा पेडणेकर, सदानंद मुंबईकर यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगून त्या काळातील आठवणी जागृत केल्या.

Exit mobile version