। पेझारी । वार्ताहर ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या प्र.ना.पाटील माध्यमिक शाळा कुर्डूस येथील एस.एस.सी.बॅच 1987 मधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच ‘अशोका रिसॉर्ट नवेनगर’ येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
यामध्ये बॅचमधील 85 टक्के मित्र मैत्रिणी उपस्थित होत्या. या प्रसंगी दिवंगत झालेल्या या बॅचमधील मित्र-मैत्रिणींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना पिंगळे व संदेश बांधणकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ शेरमकर यांनी सादर केले. प्रास्ताविकात शाळेतील तत्कालीन स्मृतींना उजाळा देण्यात आला. आपल्या शिक्षकांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले. म्हणूनच आपण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत आहोत म्हणत गुरुजनांबद्दल ऋण व्यक्त केले.
स्नेहभोजनानंतर संजय पिंगळे व विश्वास पाटील यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम झाला. याचवेळी यांच्या गाण्यावर सर्व मित्र-मैत्रिणींनी आकर्षक नृत्य सादर केले. गाण्यांची अंताक्षरी ही खेळण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित भगिनींना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व उपस्थित बंधूंना स्मृतीचिन्ह आणि गुलाबपुष्प देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बॅचमधील उपस्थित सर्व मित्र-मैत्रिणींनी परिश्रम घेतले.