। पोर्ट ऑफ स्पेन । वृत्तसंस्था ।
प्रतिकूल परिस्थितीत आव्हानांवर मात करण्यासाठी आपण कायमच तत्पर असतो. क्वीन्स पार्क ओव्हलच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर शतक झळकावल्याचे समाधान असल्याचे भारताचा विराट कोहली म्हणाला. पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या कसोटीतील पहिल्या डावात कोहलीने 121 धावांची खेळी केली. कोहलीला पाच वर्षांनंतर परदेशातील कसोटीत शतक करण्यात यश आले. पहिल्या दिवशी खेळपट्टीकडून गोलंदाजांना पुरेशी मदत होती. त्यामुळे भारताची मधली फळी अडचणीत सापडली. मात्र, कोहलीने खेळपट्टीवर ठाण मांडताना 206 चेंडूंचा सामना केला. त्याने या खेळीदरम्यान केवळ 11 चौकार मारले. प्रत्येक धावेसाठी मेहनत घ्यावी लागल्याने या शतकाचे विशेष महत्त्व असल्याचे कोहलीने सांगितले.
मला फलंदाजी करताना खूप मजा आली. मला लय सापडली होती. डावाच्या सुरुवातीला परिस्थिती आव्हानात्मक होती. खेळपट्टीवर स्थिरावणेही अवघड जात होते. मात्र, आव्हानांवर मात करण्यास मी कायमच तत्पर असतो. मैदानालगत फटके मारण्याचा माझा प्रयत्न होता, पण चेंडू लवकर सीमारेषेबाहेर जात नव्हता. त्यामुळे धावा करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. या परिस्थितीत शतक झळकावल्याचे समाधान आहे.’
विराट कोहली,क्रिकेटर
विंडीजची झुंज
विंडीजच्या फलंदाजांनी दुसर्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी चांगली झुंज दिली. भारताचा पहिला डाव 438 धावांवर संपुष्टात आला. त्याच्या प्रत्युत्तरात विंडीजची तिसर्या दिवशी 81 षटकांत 3 बाद 169 अशी धावसंख्या होती. कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 235 चेंडूंत 75 धावांची खेळी केल्यावर त्याला अश्विनने बाद केले. तेगनारायण चंद्रपॉल (33) आणि कर्क मकेन्झी (32) यांनीही चांगली फलंदाजी केली.