अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

|नागोठणे |प्रतिनिधी|


रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता नद्यांच्या पाणीपातळीवर दिसू लागला आहे. नागोठण्यातील अंबा नदीने बुधवारी दुपारी इशारा पातळी (8.00 मीटर) ओलांडत 8.25 मीटर पाणीपातळी गाठली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नदीची धोका पातळी 9.00 मीटर असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले असून वटपौर्णिमेच्या दिवशीही पावसाची संततधार कायम राहिली. बुधवारी सकाळपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळल्याने नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. नागोठणे परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे अंबा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली.


रायगड पाटबंधारे विभागाच्या कोलाड येथील पूर नियंत्रण कक्षाने बुधवारी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अंबा नदीची पाणीपातळी 8.25 मीटर इतकी नोंदविण्यात आली. इशारा पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 1 जुलै रोजी सकाळपर्यंत रायगड जिल्ह्यात सरासरी 105.97 मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा (169 मिमी), श्रीवर्धन (167 मिमी), तळा (162 मिमी) आणि मुरुड (151 मिमी) या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. माणगाव, पनवेल, सुधागड, पोलादपूर आणि माथेरान येथेही जोरदार पावसाची नोंद झाली आहे.


दरम्यान, सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असली, तरी सुरू असलेल्या पावसामुळे त्यात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदीपात्रात किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचेच पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


नागोठणे ग्रामपंचायतीकडूनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, सरपंच सुप्रिया महाडिक, प्रथम लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांच्यासह ग्रामपंचायत यंत्रणा सतत नदीच्या पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहे.

Exit mobile version