प्रयोगशाळेतील तपासणीनंतर अहवाल सादर
| नागोठणे | वार्ताहर |
अंबा नदीच्या पाटणसई व वजरोली येथील पात्रात घातक रसायनामुळे मोठ्या संख्येने मासे मृत झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर अंबा नदीच्या पाण्याचे नमुने नागोठणे प्रा.आ. केंद्राकडून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आता प्राप्त झाला असून, सदरचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष अलिबाग येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्या कार्यालयांतर्गत असलेल्या उपविभागीय प्रयोगशाळा, रोहा यांनी नोंदविला आहे.
हा अहवाल प्राप्त झाला असला तरी कोकणभुवन येथे रासायनिक तपासणीसाठी पाठवलेला नमुना त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेमुळे मुंबईतील प्रयोगशाळेला सुट्टी असल्यामुळे उद्या किंवा परवा हा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे टीसीएलने जरी पाण्यातून जंतू मारले, तरी जर पाण्यात अजून केमिकल असेल, तर असे पाणी प्यायल्याने शरीराला इजा होऊ शकते म्हणून पाण्याचे योग्यरित्या शुद्धीकरण करूनच ते प्यावे वा प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातून करण्यात आले आहे.
अहवालात काय? भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या पाण्याच्या प्रति 100 मि.मी. नमुन्यात 100 पेक्षा जास्त कोलिफोर्म आढळून आल्याने अंबा नदीतील हे पाणी थेटपणे पिण्यास अयोग्य व धोकादायक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
नागरिकांना सूचना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातून अंबा नदीच्या या पाण्यासंदर्भात नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार साठविलेल्या एक हजार लीटर पाण्यात पाच ग्रॅम टीसीएल पावडरचे द्रावण बनवून वरील निवळी शुद्धीकरणासाठी वापरावी. एक तासानंतर पाणी पिण्यासाठी वापरू शकता किंवा मेडिक्लोरचे 4 थेंब 10 लीटर पाण्यात टाका व अर्ध्या तासानंतर पाणी पिण्यासाठी वापरा, असे सांगण्यात आले आहे.