नदी पात्रात दारूच्या बाटल्यांचा खच
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
वर्हाड-जांभुळपाडा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अंबा नदीपात्रात दारूच्या बाटल्या व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या अंबा नदीपात्रात घाण व कचरा, वाळूउपसा यामुळे नदीचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. जांभुळपाडा येथे वाहणार्या अंबा नदीपात्रात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे ही नदी की डंपिंग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे.
एकीकडे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. परिसरातील नागरिकांकडून कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणून टाकण्यात येत आहे. प्रदूषित करण्यासाठी मोठा हातभार लावला जात आहे. कचर्यासोबतच काटेरी झुडुपे, मोठी झाडे, कॅरिबॅग तसेच दारूच्या बाटल्यांचा ढीग पडलेला आहे. नदीपात्रामधून कचरा व पाणी प्रदूषित होण्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. घरा-घरांमधून साठलेला कचरा प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून या ठिकाणी आणून टाकण्यात येतो. अशा प्रकारचा कचरा, प्लास्टिक पिशव्या, दारुच्या बाटल्या या पात्रात टाकू नये, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. अंबा नदी पात्रातील घाणीचे साम्राज्य पाहिल्यानंतर वर्हाड जांभुळपाडा ग्रुप ग्रामपंचायत कचरा व्यवस्थापनासाठी काम तरी काय करते, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. याबाबत लवकर लवकर उपाययोजना व्हावी, अशी मागणी जोर धरतआहे.