। अलिबाग । प्रतिनिधी ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या अध्यापक महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे.एस.एम. महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आचार्य यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात आचार्य सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चरीच्या शेतकरी संपाच्या नेतृत्वबाबतीत आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य नितेश मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व महाडचा चवदार तळे सत्याग्रह केला तो मंदिरात जाण्यासाठी अथवा पाण्यासाठी नसून समतेसाठी होता, असे नमूद केले.
प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. ऋतिषा पाटील यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व छात्र अध्यापक, अध्यापिका व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.