| महाड | प्रतिनिधी |
गेली दोन वर्षे दुरुस्तीसाठी बंद असलेला रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे या पुलाची दुरुस्ती सुरू होती. पुलावरील वाहतुक पुन्हा सुरु होणार असल्याने प्रवाशांना फारच सोयीचे होणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडण्यासाठी आंबेत येथे सावित्री नदीवर 1978 साली पुलाची उभारणी केली. या पुलामुळे खाडीपट्टा आणि रत्नागिरी भागातील अनेक गावे महामार्गाला जोडली गेली, तर दापोलीसाठी हा मार्ग एकदम जवळचा ठरला. दोन वर्षापूर्वी कमकुवत झालेल्या पुलाचा एक खांब बाजूला झुकल्याचे निदर्शनास आले. यामुळे हा पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात आला. गेली दोन वर्ष त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत डागडुजीसाठी 12 कोटी खर्च करण्यात आले आहेत. डागडुजीनंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असतानाच चाचणी दरम्यान या पुलावरून वाहन गेल्यानंतर तो हलत असल्याचे जाणवले. तपासणी केल्यावर या पुलाचा पाच नंबरचा खांब खराब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे 8 फेब्रुवारी 2021 पासून हा पूल दुरुस्तीसाठी नावाखाली वाहतुकीस बंद होता. काम पूर्ण झाले असून पुलाची चाचणी करून शुक्रवारपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याची माहिती उपअभियंता श्रीकांत गणगणे यांनी दिली.
या विभागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून त्याची वाहतूक होते. काही वर्षांपूर्वी या पुलाखाली सक्शन पंप पुलाच्या खांबाला बांधून वाळूचे उत्खनन करण्यात आले होते. त्यामुळे पिलर कमकुवत झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पुलाखालून वाहतूक करणाऱ्या वाळूच्या नौका अनेक वेळा खांबाला धडकल्याच्या घटना घडल्या आहेत.