| रसायनी | प्रतिनिधी |
आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारने ‘धरती आबा जन जातीय ग्रामउत्कर्ष’ अभियानांतर्गत आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. याबाबत खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत कलोते येथील आदिवासी वाडीत विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी जाऊन माहिती दिली.
खालापूर तालुक्यांमधील 10 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यापैकी खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्रामपंचायत कलोते अंतर्गत विनेगाव, दांडवाडी, बापदेववाडी, कातळाचीवाडी, कांढरोली तर्फे वनखळ या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी माणिक सानप, विस्तार अधिकारी विनोद चांदोरकर, महिला व बालकल्याण संघमित्रा अंधोरीकर, कनिष्ठ अभियंता पूनम म्हात्रे, विस्तार अधिकारी अमित म्हसकर, ग्राम पंचायत अधिकारी निलेश म्हसकर, कृषी अधिकारी नितीन महाडिक, प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे, ग्राम महसूल अधिकारी माधव कावरखे, कृषी सहायक सारंग व वन विभाग कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, ग्राम पंचायत सदस्य, पोलीस पाटील यांनी भेट देऊन कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी आदिवासी बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







