अँड्रियस गौसची झुंज अपयशी
। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।
भेदक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अखेरीस अमेरिकेवर विजय मिळवलाच. विस्फोटक फलंदाजी, कमालीचे क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी या तिन्ही विभागातील शानदार कामगिरीसह अमेरिकेने आफ्रिकेला सहज विजय मिळवू दिला नाही.
हरमीत सिंग आणि अँड्रयू गोसच्या भागीदारीने आफ्रिकेला घाम फोडला पण संघाने अखेरीस 18 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डीकॉकच्या 74 धावा आणि मारक्रमच्या 46 धावांसह 4 बाद 194 धावांचा डोंगर उभारला. अमेरिकेने कडवी झुंज देत या लक्ष्याचा पाठलाग करताना 6 बाद 176 धावा करू शकले. अँड्रियस गौसने विस्फोटक फलंदाजी करत संघासाठी 47 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 80 धावांची खेळी केली, पण संघाला विजय मिळाला नाही. कगिसो रबाडाच्या भेदक गोलंदाजीसमोर आणि हरमीत सिंगच्या विकेटनंतर सामना पलटला आणि अमेरिकेला पराभव पत्करावा लागला.
अमेरिकेच्या पराभवाचा टर्निंग पॉईंट काय ठरला? 19व्या षटकात कागिसो रबाडाने सामना फिरवला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने शानदार फलंदाजी करणार्या हरमीत सिंगची विकेट घेतली. 21 चेंडूत 38 धावांवर खेळत असलेल्या हरमीतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सीमारेषेवर झेलबाद झाला. हरमीतच्या विकेटनंतर अमेरिकेच्या संघाला मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली नाही. या षटकात रबाडाने केवळ 2 धावा दिल्या.