चित्रकार पराग बोरसेंना अमेरिकेचा पुरस्कार

। माथेरान । वार्ताहर ।

अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने भारतीय कलाकार पराग बोरसे यांना 2024 सालचा बहुमोल समजला जाणारा फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल पुरस्कार जाहीर केला आहे. नुकताच मॅनहॅटन, न्यूयॉर्कमध्ये एका आलिशान समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माथेरान पर्यटनस्थळ हे आजोळ असलेल्या परागवर येथे शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

न्यूयॉर्कमध्ये भरलेल्या ‘एंडूरिंग ब्रिलियंनस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे 52 वे वर्ष असून, यावर्षी अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून 1155 सबमिशन प्राप्त झाली होती. त्यांनी समावेशासाठी केवळ 125 कलाकृती निवडल्या होत्या. पराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले ‘ए टर्बन गेझ’ हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्तिचित्रण आहे. पराग बोरसे यांच्या या चित्राची पुरस्काराकरिता निवड जेरेनिया विल्यम मॅककारथी (द वेस्ट मोरलँड म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट, ग्रीन्सबर्ग, पेन्सिल्वेनियाचे मुख्य आर्ट क्युरेटर) या पंचांनी केली आहे. रोख एक हजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची फ्लोरा बी गुफिनी यांनी 1972 मध्ये स्थापना केली. ही अमेरिकेतील सर्वात जुनी कला संस्था आहे. पराग बोरसे हे एकमेव भारतीय कलाकार आहेत ज्यांच्या कलाकृतीची या संस्थेने आपल्या वार्षिक प्रदर्शनासाठी चार वेळा निवड केली आहे. पराग बोरसे यांना यापूर्वी दोन वेळा पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट अमेरिका यांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. तसेच अमेरिकेतून प्रकाशित होणार्‍या पेस्टल जरनल या मॅक्झिननेसुद्धा त्यांना दोन वेळा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कर्जत शहरातील युवक आणि माथेरान हे पर्यटनस्थळ आजोळ असलेल्या परागला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्याबरोबरच माथेरानमधूनदेखील आनंद व्यक्त करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version