| माथेरान | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले भारतीय कलाकार पराग बोरसे यांना त्यांच्या ‘द पिर्सिंग लूक’ या चित्रासाठी पेस्टल सोसायटी ऑफ द वेस्ट कोस्ट तर्फे दिला जाणारा ‘फाईन आर्ट कॉनोइस्सर अवॉर्ड 2025′ मिळाला आहे. याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांना न्यूयॉर्क येथील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिकाकडून पुरस्कार मिळाला होता. एका महिन्यात दोन मोठे अमेरिकन पुरस्कार मिळवण्याचा मान त्यांनी पटकावला आहे.
1984 मध्ये स्थापन झालेली पेस्टल सोसायटी ऑफ द वेस्ट कोस्ट ही संस्था जवळपास 40 वर्षे पेस्टल कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी कार्यरत आहे. त्यांच्या 2025च्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी जगभरातून आलेल्या चित्रांमधून केवळ 99 कलाकृती अंतिम निवडीसाठी स्वीकारल्या गेल्या होत्या. या स्पर्धेतील परीक्षक म्हणून प्रख्यात पेस्टल कलाकार कोलेट ओड्या स्मिथ यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. या निवडीत पराग बोरसे यांच्या ‘द पिर्सिंग लूक’ या चित्राला विशेष मान मिळाला असून त्यांना 1 हजार अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेचा पुरस्कार देण्यात आला आहे. दात्यांनी प्रायोजित केलेला हा पुरस्कार बोरसे यांना तिसऱ्यांदा पीएसडब्लूसी कडून मिळाला आहे. पुरस्कारप्राप्त चित्र सध्या लॉस एंजेलिसजवळील हिल्बर्ट म्युझियम ऑफ कॅलिफोर्निया आर्ट येथे प्रदर्शित असून, हे नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.





