विविध वेशभूषांचे थरारक प्रयोग
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील बोरगाव गावात नवरात्र उत्सव म्हटला की भक्ती, परंपरा आणि जल्लोष हा असतोच. याच काळभैरव बोरघर गावात हा उत्सव भन्नाट पद्धतीने रंगला होता. मंदिर परिसरात मनोभावे पूजा-अर्चा आणि काळभैरव देवतेची जागृत सेवा सुरू असतानाच, गावातील तरुणाईने परंपरा व आधुनिकतेचा संगम घडवत नवरात्रीला नवा आयाम दिला आहे. गावातील तरुण मंडळी, माता-भगिनी, लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्साह पाहून प्रत्येकजण दंग होत आहे. या उत्सवात विविध वेशभूषांचे थरारक प्रयोग आकर्षणाचा विषय ठरले आहेत.
यावेळी लग्नसमारंभातील देखणी मिरवणूक, गुजराती पारंपरिक पेहरावात थिरकणारे दांडिया नृत्य, शंकर-पार्वती व गणेश वेशभूषा, भात झोडणी परंपरा, गंगुबाई नॉन मॅट्रिक व दादा कोंडके शैलीतील विनोदी परिभाषा, वारकरी संप्रदाय ते जंगली मानव यांची झलक, कोळी जीवनपट साकार करणारी मंडळी, साईबाबा व देवीच्या विविध रूपांचे दर्शन, क्रिकेट संघाचा हटके अविष्कार, दक्षिणात्य वेशभूषा, बेवड्याचे लिवर विनोदी सादरीकरण, ज्योतीबा-वासुदेव परंपरा, भंगार वाला, चेटकीन व माकड रूप अशा भन्नाट कलाकृतींनी संपूर्ण गाव थरारून गेले आहे. गावकऱ्यांच्या या उपक्रमांना ‘माझा गाव, माझा उत्सव’ या इंस्टाग्राम हॅशटॅगखाली प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक व्हिडिओला शेकडो व्ह्यूज देखील मिळाले आहेत. सोशल मीडियावर ही धमाल नवरात्र उत्सवाची रंगत आणखी वाढवत आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची मेजवानी यावेळी केवळ वेशभूषा आणि नृत्याच नव्हे तर स्वच्छता अभियान, महिला सबलीकरणावरील व्याख्याने, वारकरी गीते, सामूहिक आरत्या, दांडिया आणि भजनांनी उत्सवाची शोभा वाढवली आहे.
सोशल मीडियावर धुमाकूळ
या नवरात्रोत्सवाची खरी प्राणशक्ती काळभैरव मंदिर आहे. येथे रोज भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोभावे पूजा-अर्चा करतात. हे देवस्थान गावाचे जागृत व अभिमानस्थान मानले जाते. काळभैरव बोरघर नवरात्र उत्सवाने गावातील परंपरा, भक्ती, जल्लोष आणि आधुनिकता एकत्र आणली असून, हा उत्सव आता सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहे.






