झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत अमेय पाटीलने झळकावले शतक

। भाकरवड । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित चौदा वर्षा खालील सुरू असलेल्या लेदर बॉल एक दिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा मधल्या फळीतला अष्टपैलू खेळाडू अमेय पाटील यांनी रायझिंग स्टार खोपोली संघाच्या विरुद्ध नाबाद 112 धावा काढत स्पर्धेतील दुसरे शतक झळकावले. 17 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने त्यांनी 86 चेंडूंत नाबाद 112 धावा ठोकल्या.
प्रथम फलंदाजी करताना उरण संघाने 40 षटकांच्या समाप्ती नंतर 10 गडी बाद 193 धावा केल्या होत्या. त्यात अमेय पाटीलच्या 112 धावांचा समावेश आहे. त्याला आदिती कदम हिने सुरेख साथ देत 22 धावा काढल्या. खोपोली संघाकडून निषाद मोरे 3 तर निहार दिघे आणि शुभम जाधव यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. उरणच्या 193 धावांना प्रतिउत्तर देताना खोपोली संघाने कडवी टक्कर दिली. आर्यन निकाळजेच्या 63, तेजस गिलबिले 30 तर अथर्व पाटीलने 23 धावा केल्या. अटीतटीच्या सामन्यात शेवटी उरण संघाने अंतिम षटकांमध्ये अचूक गोलंदाजीच्या जोरावर सामना 18 धावानी जिंकला. अर्चित म्हात्रे सर्वाधिक 4 तर ओम म्हात्रे आणि मानव बावने यांनी प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. अमेय पाटील याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Exit mobile version