रायगडावर छ. शिवाजी महाराजांची पुण्यतिधी साजरी
। रायगड । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराजांची आज शनिवारी (दि. 12) तिथीनुसार 345 वी पुण्यतिथी आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगताना, छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका, महाराजांकडून देश आणि जग प्रेरणा घेत असल्याचे शाह यांनी म्हटले. तसेच, रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनवू, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिधीनुसार पुण्यतिधी निमित्त आयोजित कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी आपल्या भाषणात अमित शाहांनी मोठा संकल्प केला. ते म्हणाले, स्वराजाची संकल्पना ही शिवाजी महाराजांची होती. त्यांनी 200 वर्षांची मुघलांची गुलामगिरी संपवली. तसेच, स्वातंत्र्यासाठी त्यांचीच प्रेरणा होती. आपल्याला स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहे. जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा भारत जगात एक नंबरवर असले, असा संकल्प अमित शाह यांनी केला.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, मी येथे भाषण करण्यासाठी आलो नाही तर प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे. जेथे महाराजांचे सोन्याचे सिंहासन होते ते जेथे बसत होते तेथे नमन करून मी रोमांचित झालो. आमचे सरकार हे रायगडला फक्त पर्यटनस्थळ बनवणार नाही तर प्रेरणास्थळ बनवेन. तसेच, मी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो की शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेऊ नका. देश, जग त्यांच्यापासून प्रेरणा घेते. आपल्या स्वातंत्र्याची पहिली लढाई त्यांनी लढली. रायगडापासून प्रेरणा घेऊ नये म्हणून इंग्रजांनी रायगड उद्धवस्थ करण्याचा प्रयत्न केला, असे देखील अमित शाह म्हणाले.