। महाड । प्रतिनिधी ।
रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची 345वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. शिवपुण्यतिथीनिमित्ताने झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. नियोजित कार्यक्रमानूसार अमित शाह यांच्यासह केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. मात्र, ऐनवेळी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याचा आग्रह केला. मात्र, अजित पवारांना भाषण करण्याची संधी दिली नाही, त्यामुळे उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली होती.
आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाषणासाठी पुकारले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे साहेब सांगत एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. परंतु, अजित पवार यांचे भाषण झाले नाही. या सोहळ्यात मोजकीच भाषणे होती. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती. परंतु, एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी संधी मिळाल्याने त्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांचेही भाषण झाले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अमित शाह यांचे कौतूक केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी 307 कलम हटवले. देशाच्या सीमेवर उपद्रव करणार्यांना वठणीवर आले. आता ते सर्व बिळात बसले आहेत. देशात हिंसाचार फैलावणारे जे लोक होते, मग त्यात नक्षलवादी असो की अतिरेकी त्यांचा बंदोबस्त गृहमंत्री करत आहेत. तहव्वूर राणा यालाही भारतात आणले. त्याला मुंबईतसुद्धा आणले जाईल. त्याला फाशी देण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
रायगडावर उदयनराजेंच्या या मागण्या
रायगडावर आयोजित कार्यक्रमात खा. उदयनराजे भोसले यांनी अमित शाहांसमोर पाच मागण्या मांडल्या.
* शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि जिजाऊ मातांबाबत कायदा करा. अजामीनपात्र गुन्हा करा. दहा वर्ष जामीनच मिळू नये.
* छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन मान्य इतिहास प्रकाशित करा. जेणे करून भेदभाव होऊ नये. तेढ होऊ नये आणि सिनेमॅटिक लिबर्टीबाबत सेन्सॉर बोर्डाची स्थापना करावी.
* अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर शिवाजी महाराज, संभाजी महाराज आदी युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण केले जात आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड असावे.
* रामायण सर्किटची स्थापना झाली. बुद्ध सर्किट झाली. तसेच शिवस्वराज्य सर्किट करावं.
कालच रेल्वे मंत्र्यांनी त्याची घोषणा केली. खर्या अर्थाने शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक व्हावं ही शिवभक्तांची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले.