अमोल मिटकरी वाहन हल्ला प्रकरण!

मनसे कार्यकर्ताचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

| अकोला | वृत्तसंस्था |

राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात सहभागी मनसे कार्यकर्ताचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.30) रात्री घडली. अमोल मिटकरी यांनी ठिय्या आंदोलन करून दबाव आणल्याने मनसे कार्यकर्ताचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मृत्यू झालेल्या मनसे कार्यकर्ताचे नाव जय मालोकार (24) असे आहे.

दरम्यान, अमोल मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला प्रकरणात कार्यकर्ता जय मालोकार यांचा सहभाग होता. वाहन तोडफोड आंदोलन प्रकरणात पोलिसांनी पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये जय मालोकार यांचा देखील सहभाग होता. आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने मनसे कार्यकर्ता जय मालोकार प्रचंड तणावात आले. या दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका मंगळवारी रात्री आला. उपचारासाठी त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिली. जय मालोकार यांचे होमिओपॅथीच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण सुरू होते. मनसेचे आंदोलन व त्यानंतर पोलीस कारवाईचा दबाव आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप होत आहे. मनसैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूला अमोल मिटकरी जबाबदार असल्याचा आरोप पंकज साबळे यांनी केला आहे. जय मालोकार यांच्या निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून शहरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version