| अमरावती | वृत्तसंस्था |
अमरावतीमध्ये एक वेगळीच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.शरीरसौष्ठवचे वेड अनेकांना असते. मात्र, फार कमी लोक यात यशस्वी होतात.शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी तुमच्या मनात जिद्द आणि प्रतिबद्धता, गांभीर्य असणे आवश्यक असते. नेमकं हेच सांगण्याचा प्रयत्न दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धकांनी केला. जागतिक दिव्यांग दिनाच्या पूर्वसंध्येला अमरावतीमध्ये दिव्यांग महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी विविध पोजेस सादर करून आपण कुणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले. अमरावती जिल्हा पॅराऑलिम्पिक असोसिएशन आणि अमरावती महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेकांचे सगळीकडे कौतुक होत आहे.