| कोल्हापूर | प्रतिनिधी |
प्रसिद्ध ज्योतिबा मंदिरातील धक्कादायक प्रकार समोर आला असून मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांकडून परीते गावातील दोन भाविकांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर, व्हिडिओत दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ मारल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एका बाजूला काही नागरिक मद्यप्राशन करुन हुलडबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, देवकार्यात आणि देवाच्या छबिना सोबत छेडछाड केल्याच्या प्रकरणातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, परिते ग्रामस्थांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मद्य प्राशन केल्याचा दावा खोडून काढत ज्योतिबा मंदिर मधील पुजाऱ्यांनी या वादाची सुरुवात केल्याचे परिते ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणात परिते गावातील भाविकांना पुजाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे गावकरी आक्रमक झालेले आहेत. परिते गावातील ग्रामस्थांनी आज गावात निषेध फेरी काढत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मारहाण करणाऱ्या संबंधित पुजाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील केली आहे.







