दोन जण गंभीर जखमी
। पुणे । प्रतिनिधी ।
येवलेवाडी भागातील काचेच्या कारखान्यात रविवारी (दि. 29) एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
‘इंडिया ग्लास सोल्युशन कंपनी’च्या येवलेवाडी येथील कारखान्यात हि दुर्घटना घडली. या कारखान्यात परदेशातून मोठ-मोठ्या काचा आणल्या जातात. या काचांवर प्रक्रिया करून, त्या पुन्हा विक्रीसाठी बाजारात पाठविल्या जातात. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास कंटेनरमधून काचा खाली उतरविताना ‘सेफ्टी बेल्ट’ तुटला. त्यामुळे दोनशे किलोच्या दोन मोठ्या काचा कामगारांच्या अंगावर पडल्या.
या घटनेनंतर अन्य कामगारांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेनच्या साहाय्याने अडकलेल्या कामगारांची सुटका करून तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर जखमी दोघांवर उपचार सुरु आहेत.