| पुणे | प्रतिनिधी |
पुणे शहरात पुन्हा एकदा भरधाव वेगामुळे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ रविवारी (दि. 2) पहाटेच्या सुमारास एका भरधाव कारने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात कोरेगाव पार्क परिसरातील बंड गार्डनर मेट्रो स्टेशनजवळ पहाटेच्या सुमारास झाला. अतिशय वेगात असलेली ही कार रस्त्यावरील डिव्हायडरला धडकून अनियंत्रित झाली आणि थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला. या अपघातात ऋतिक भंडारे आणि यश भंडारे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.







