| माणगाव | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यात लवकरच पाच कोटींचा कृषी प्रकल्प उभारण्याची घोषणा शेकाप नेते निलेश थोरे यांनी केली आहे.
म्हसळा तालुक्यातील शेतकर्यांना मुख्य प्रवाहात आणून ग्लोबल मार्केटचे दार उघडून देण्यासाठी म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी ली. ची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन नाबार्डचे नोडल ऑफिसर प्रदीप अपसुंदे यांच्या हस्ते व उपजिल्हाधिकारी सतीश बोर्हाडे व महा.एफ.पी.सी. प्रकल्प व्यवस्थापक अक्षय गांगर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शेतकरी व कंपनीचे भागधारक यांच्या साक्षीने पार पडले.
यावेळी पारंपारिक पद्धतीने बैलपूजन करण्यात आले तर तालुक्यातील आदर्श शेतकर्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. म्हसळा तालुक्यात कंपनीच्या माध्यमातून कृषीक्षेत्रामध्ये येत्या आर्थिक वर्षात तब्बल पाच कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा निलेश थोरे यांनी केली. ज्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार असून कृषी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधीदेखील तरुणांना उपलब्ध होणार आहेत.
कंपनीच्या माध्यमातून भात खरेदी केंद्र व थेट शेतकरी ते ग्राहक तत्वानुसार कांदा विक्री केंद्राचे उदघाट्न करण्यात आले असून त्यामुळे म्हसळा तालुक्यातील शेतकर्यांना भात विक्री करीता यापुढे माणगाव, रोहा, इंदापूर येथे न जाता तालुक्यामध्येच आपला भात विक्री करता येणार आहे ज्यामुळे शेतकर्यांचे अतिरिक्त श्रम, वेळ व वाहतूक खर्चाची देखील बचत होणार आहे. म्हसळा तालुक्यातील उत्पादित होणार्या सर्वच शेतमालाची म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दराने थेट बांधावरूनच खरेदी करण्यात येणार असून शेतमालावर प्रक्रिया करून जास्तीत जास्त परतावा शेतकर्यांना कसा देता येईल ह्या दृष्टिकोनातून परदेशातील शेतीतंत्र व कृषीतज्ञांच्या मदतीने म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी प्रयत्नशील राहणार असल्याचे थोरे यांनी सांगितले.
नाबार्डचे प्रदीप अपसुंदे यांनी कंपनीच्या सर्व संचालक मंडळाचे विशेष कौतुक करून लवकरच म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी ही राज्यातील प्रमुख उत्पादक कंपन्यांच्या यादीत कशी आणता येईल याकरिता नाबार्डतर्फे सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन कंपनीला करणार असल्याचे सांगितले .
प्रमुख पाहुणे सतीश बोर्हाडे यांनी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाची माहिती देतानाच कंपनीच्या पाच कोटीच्या स्मार्ट प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देणार असल्याचे सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी कंपनीच्या माध्यमातून आपले हित साधून घेण्याचे आवाहन त्यानी केले,
जिल्हा बँकेचे शाखाधिकारी यांनी शेतकर्यांना जिल्हा बँकेमार्फत पुरवल्या जाणार्या विविध सुविधा व योजना याबद्दल सविस्तर माहिती देतानाच जिल्हा बँक शेतकर्यांच्या हितासाठी सदैव म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी ली. च्या पाठीशी ठाम राहणार असल्याची खात्री दिली. प्रसंगी कंपनीचे संचालक गौरीताई पयेर, संचालक मनोहर तांबे, संचालक पांडुरंग मेंदाडकर, संचालक निलेशजी थोरे,चेयरमन निलेशजी मांदाडकर,महा एफपीसीचे जिल्हा समन्वयक महेश खांडेकर,धनराजजी गायकवाड,जिल्हा बँकेचे शाखाधिकारी मुंढे व शेतकरी बांधव भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.