मार्ग सुरू होण्यापूर्वीच कंटेनर, दोन एसटी बसेसचा अपघात
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून गेल्यावर्षी गणेशोत्सवापूर्वी चाकरमान्यांच्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आल्यानंतर यंदा 3 सप्टेंबर रोजी दुसरा भुयारी मार्ग सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौर्यादरम्यान दिले होते. मात्र, दुसरा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच गुरूवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास पहिल्या भुयारी मार्गामध्ये एका कंटेनरचालकाने अचानक ब्रेक्स दाबल्याने मागून येणारी एसटी बस कंटेनरवर धडकली, तर एसटी बसच्या मागून येणार्या दुसर्या एसटी बसने आधीच्या बसला धडक दिल्याने तीनही वाहनांची एकाच वेळी टक्कर होऊन अपघात झाला. परिणामी, कोकणात जाणार्या चाकरमानी जनतेचा खोळंबा झाल्याने दुसरा भुयारी मार्ग सुरू होण्यापूर्वी पहिल्या भुयारी मार्गाने संभाव्य धोक्याची घंटा वाजविल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी कशेडी टॅप वाहतूक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक बाबुभाई नरसिंगभाई (56, रा. अहमदाबाद, गुजरात) हा त्याच्या ताब्यातील कंटेनर घेऊन गोवा दिशेने जात असताना कशेडी घाटाच्या पर्यायी भुयारी मार्गामध्ये आला असता त्याने अचानक कंटेनरला ब्रेक लावल्याने पाठीमागून येणार्या एसटी बसचा चालक प्रकाश प्रल्हाद विरकर (54, रा. धनगरनगर, शेगाव, जि. बुलढाणा) हा त्याच्या ताब्यातील एसटी बस मुंबई ते मालवण असा 25 प्रवासी घेऊन जात असताना व दुसरा बस चालक संतोष हरमकर (41, रा. शहापूर ठाणे) हा आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच 20 सीजी 4563) ठाणे ते खेड 45 प्रवासी घेऊन जात असताना कशेडी बोगद्यात कंटेनर चालकाने ब्रेक लावल्याने तीनही वाहने एकमेकांवर आदळून तिहेरी अपघात झाला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कशेडी घाटातील भुयारी मार्गातील या अपघातानंतर तब्बल एक तास अन्य वाहनांतील प्रवाशांना भुयारी मार्गात उतरून वाहतूक सुरळीत होईपर्यंत अपघातग्रस्त वाहने व भुयारी मार्ग दर्शनाने टाईमपास करावा लागला. पोलिसांनी तातडीने याठिकाणी येऊन वाहतूक सुरळीत केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होऊनही वाहने कोकणाकडे मार्गस्थ होण्यास मदत झाली. 3 सप्टेंबर रोजी दुसर्या भुयारी मार्गातून गणेशोत्सवापुरती वाहतूक सुरू करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी संकेत दिले असताना दुसर्या भुयारी मार्गातील पुष्कळसे काम अपूर्ण असल्याने ते युध्दपातळीवर पूर्ण करण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र, तरीदेखील निर्धारित 3 सप्टेंबरची तारीख उलटूनही भुयारी मार्ग सुरू करण्यात आला नसताना पहिल्या भुयारी मार्गातील या अपघाताने समोरासमोरून वाहतूक सुरू असताना झालेल्या अपघातावेळी वाहतुकीची कोंडी भुयारी मार्गात किती कमी वेळात होऊ शकते, याची चुणूक दाखविल्याने दुसर्या भुयारी मार्गातून तातडीने वाहतूक सुरू करण्याची अपरिहार्यता निर्माण झाली आहे.