महामार्गाच्या दुरवस्थेचा त्रास
| महाड | प्रतिनिधी |
यावर्षी 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. कोकणातील या भव्य गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसू लागले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने यावर्षीदेखील कोकणातील चाकरमान्यांना या खड्डे रस्त्यांचा त्रास होणार आहे.
गणेशोत्सव कोकणामध्ये मोठ्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये साजरा केला जातो. नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे, सुरत, अहमदाबाद, पुणे अशा महाराष्ट्रातील विविध शहरात असलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जून आपल्या गावात दाखल होतात. गेली दोन दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतरदेखील महामार्गाची दुरवस्था कायम असल्याने यावर्षीदेखील खड्ड्यातूनच चाकरमान्यांना प्रवास करावा लागणार आहे. शिवाय, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीचादेखील फटका बसत आहे. यावर्षी 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असल्याने 4 सप्टेंबरपासूनच गणेशभक्तांची कोकणात जाण्यास सुरुवात झाली. अनेक जण रेल्वे प्रवास पत्करत असले, तरी ज्यांना रेल्वेने शक्य होत नाही, ते आपल्या वाहनांनी प्रवास करतात. ज्या महामार्गावरून हे चाकरमानी प्रवास करतात, त्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा चौपदरीचा पहिला टप्प्याचे काम अद्याप बाकी आहे. तर, दुसरा टप्पा महाड तालुक्यापासून कोकण तळापर्यंत 90 टक्के पूर्ण झालेला आहे. बहुतांश कामे झाल्याचे मंत्र्यांच्या दौर्यातून भासवले जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्यांची संख्या यावर्षी अधिक आहे. महामार्गावर तीन ठिकाणी वाहतूक कोंडी कायम होत आहे. माणगाव, लोणेरे आणि टेमपाले या तीन ठिकाणी फार मोठ्या अडचणी निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. तासन्तास वाहनांच्या रांगा लागत असल्याने गणेशभक्तांना महामार्गावर वाहनांतून बसून राहावे लागत आहे. माणगावमध्ये अरुंद रस्त्यावर लागलेली दुकाने आणि रस्त्यालगत बेजबादारपणे उभी करण्यात येणारी वाहने तसेच लोणेरे आणि टेमपाले या ठिकाणी सुरू असलेल्या पुलांची कामे आणि महामार्गावर पडलेले खड्डे हे कोकणात जाणार्या गणेशभक्तांना अडचणीचे ठरले आहेत.
एसटीने प्रवास करणार्या चाकरमान्यांनादेखील या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच ज्या गाड्या सीएनजीवर अवलंबून आहेत, त्यांनादेखील सीएनजी भरण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एसटीमध्ये सीएनजी भरण्यासाठी पेणनंतर महाड या ठिकाणी बसेस थांबवाव्या लागत आहेत. सीएनजी भरताना प्रवाशांना खाली उतरावे लागते, त्यामुळे महाड आगारात असलेल्या सीएनजीवर प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीच सुविधा नाही तसेच स्वच्छतागृह सुविधादेखील नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. हीच अवस्था खासगी सीएनजी पंपांवरदेखील दिसून येत आहे.