ओबीसी संघटनांच्या मोर्चात सहभागी व्हा-निलेश थोरे

। माणगाव । प्रतिनिधी ।
अलिबाग येथे होणार्‍या ओबीसी जनमोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ओबीसी संघटनेचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निलेश थोरे यांनी केले आहे. समाजासाठी गुन्हेच काय छातीवर गोळ्या झेलायची देखील आमची तयारी असल्याचा निर्धारही त्यांनी केला आहे. शुक्रवारी ओबीसी समाजातर्फे निघणार्‍या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर कृषीवलशी बोलताना थोरे यांनी मोर्चाबाबतची भूमिका स्पष्ट केली.

ओबीसी समाज शासनाच्या अनेक सोयी-सुविधांपासून आजही वंचित राहिलेला आहे. ओबीसी समाजाची जनगणना होण्यासाठी देशात सर्वत्र लढा उभारण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रायगडात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. जनमोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुरेश मगर व सर्व पदाधिकार्‍यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढणार असल्याचे थोरे यांनी आपल्या मनोगतात म्हंटले आहे.

ओबीसी समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे सन 1931 नंतर संपूर्ण देशात ओबीसींची जनगणना सरकारने केली नाही ती केली जावी, ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकारणापासून वंचित ठेवले जात आहे. दर 10 वर्षानी जनगणना होते. त्यामधून अनुसूचित जाती-जमाती व अल्पसंख्यांकांची जातनिहाय व धर्मनिहाय जनगणना केली जाते. एवढेच नव्हे तर देशातील पशु-पक्षांची मोजदाद होते. ओबीसींची मात्र दखल घेतली जात नाही.

ओबीसींची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय स्थिती कशी आहे? हे कळल्याशिवाय त्यांच्या विकासासाठी धोरण ठरविता येणार नाही. निश्‍चित लोकसंख्येअभावी ओबीसींना शिक्षणासाठी व अन्य विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नाही. जो तुटपुंजा निधी मिळतो, तोही शासन वेळेवर देत नाही. उच्चशिक्षणासाठी वसतिगृहांची सोय नाही. स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार शिक्षण वा प्रशिक्षण मिळत नाही. शासकीय सेवेत प्रथम श्रेणीसहित अधिकारांच्या सर्व जागांवर ओबीसींचे प्रमाण खूपच कमी आहे.

विकासासाठी पुरेसा निधी दिला जात नाही.त्यामुळेच एकंदरीत ह्या सर्व प्रश्‍नांवर संबंधित प्रशासनाला जाब विचारण्यासाठी व आपल्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवानी एकजुटीने व लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे व आपली ताकद काय आहे हे दाखवून द्यावे असे आवाहन थोरे यांनी केले आहे.

Exit mobile version