| माणगाव | प्रतिनिधी |
ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या नावामध्येच संघटनेचा हेतू स्पष्ट आहे, त्यामुळे सर्व ओबीसी समाजामध्ये समन्वय साधून त्यांच्या कल्याणासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे व संघर्षाच्या फलितामधून समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल ह्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी केले आहे.
थोरे यांची ओबीसी संघर्ष समन्वय समिती जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शासकीय विश्रामगृह रोहा येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत सर्वानुमते थोरे यांची नियुक्ती ओबीसी जनमोर्चा व ओबीसी संघर्ष समन्वय समिती जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी ओबीसी युवक जिल्हाध्यक्ष पदासाठी निलेश थोरे यांची मागणी जिल्हातील जवळपास प्रत्येक तालुक्यातून आल्याने त्यांना आपण नियुक्त करत आहोत व ह्या पदाला ते न्याय देतील असा विश्वास आपल्याला आहे, असेही त्यांनी सुचित केले.
ओबीसी हा घटक बहुसंख्य असूनदेखील कायमच दुर्लक्षित राहिला आहे. आज इतर समाज जेव्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतात तेव्हा सगळ्यात जास्त सहभाग किंवा सहकार्य हे ओबीसी समाज करत असतो. पण आज आपल्यालाच एकमेकांना मदत करण्याची व एकीचे बळ दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
निलेश थोरे, नूतन अध्यक्ष
माझ्यावर सुरेश मगर यांच्यासह इतर सगळ्यांनीच जो विश्वास दाखवून माझी नियुक्ती केली आहे तो विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी समाजाचा (दि.18) अलिबाग येथे जनमोर्चा निघणार आहे. तो निश्चित यशस्वी करुन दाखवू, असा दावाही त्यांनी केला. मोर्चा काढला म्हणून वेळप्रसंगी गुन्हे दाखल व्हायची वेळ आली तरी समाजासाठी सगळ्यात पुढे हा निलेश थोरे असेल ह्याची सुद्धा सगळ्यांनी खात्री बाळगावी व संपूर्ण जिल्ह्यातील ओबीसी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर अलिबाग येथे जमावे व लाखोच्या संख्येने उपस्थित राहून होणारा मोर्चा हा भूतो न भविष्यती करून दाखवावा, असे आवाहनही थोरे यांनी केले.
याप्रसंगी माणगाव तालुका अध्यक्ष अरुण चाळके, नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार,अनिल नवगणे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, संजय अप्पा ढवळे,कुणबी समाजाचे अध्यक्ष महादेव बक्कम, सुभाष केकाणे, शैलेश भोनकर, काका नवगणे, रामभाऊ टेंबे, रामभाऊ म्हसकर यांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत, तर निवडीचे पत्र ओबीसी जनमोर्चा जिल्हाअध्यक्ष सुरेश मगर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवराम महाबळे, कुणबी समाज रोहा तालुका अध्यक्ष शिवराम शिंदे, आगरी समाज रोहा तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र मोरे, ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे, तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम, माणगाव तालुका सरचिटणीस राजेंद्र खाडे, रोहा तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे, विभागीय अध्यक्ष अमित मोहिते, शहर खजिनदार महेंद्र मोरे, युवक तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे, सरचिटणीस मंगेश रावकर, मुकेश भोकटे, अमित पवार, आशिष स्वामी, अप्पा मोरे, उतेश पडवळ, प्रसाद खुळे, महेश तुपकर, हेमंत मालुसरे ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.