पोलिसांच्या कामगिरीचा चढता आलेख

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा पोलिसांच्या दमदार कामगिरीचा आलेख चढता आहे. सन 2022 या संपूर्ण वर्षात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोख बजावण्यात रायगड पोलीस यशस्वी ठरले आहेत. रायगड पोलिसांच्या अखत्यारीत असणार्‍या 28 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या 2 हजार 585 गुन्ह्यांपैकी 2 हजार 243 गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांच्या दप्तरी आता केवळ 345 गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. रायगड पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणात 87 टक्क्यांपर्यंत मजल मारली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

रायगड जिल्हा पोलिसांच्या वार्षिक कार्याचा आढावा सादर करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, श्रीवर्धन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ, जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात सन 2022 मध्ये 2585 गुन्हे 28 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 2243 गुन्हे उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गुन्हे उघडकीस आणायचे प्रमाण 87 टक्के इतके आहे. दाखल असणार्‍या गुन्ह्यांपैकी 345 गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित आहेत. प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण 13.34 टक्के इतके आहे. रायगड जिल्ह्याचे गुन्हे शाबितीकरणाचे प्रमाण 68 टक्के इतके आहे. रायगड जिल्ह्यात 6432 जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये एमपीडीए नुसार रायगड जिल्ह्यातील 1 धोकादायक इसम यास एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले. मुंबई पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये 4 गुन्हेगारी टोळ्यांना तर मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 आणि 57 नुसार 10 जणांना रायगडातून हद्दपार करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील 1 गुन्हेगारी टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात सन 2022 मध्ये 38 खुनांचे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी 35 गुन्ह्यांची उकल झाली आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे 30 गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांनी केली आहे. रायगड पोलिसांच्या कार्यक्षेत्रांतील पोलीस ठाण्यांमध्ये मालमत्ता विषयक 677 गुन्हे दाखल झाले. यापैकी 438 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. शरीराविरुद्धचे 448 गुन्हे दाखल असून 447 गुन्ह्यांची उकल झाली आहे. फसवणुकीच्या 180 दाखल गुन्ह्यांपैकी 146 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून अतिप्रसंगाचे दाखल 106 गुन्हे पोलिसांनी तपासात उघड केले आहेत. विनयभंगाचे दाखल असणार्‍या 113 गुन्ह्यांपैकी 110 गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी महिलांना न्याय मिळवून दिला आहे. महिला , मुली आणि लहान मुलांचे अपहरण आणि अपनयन याबाबतचे 133 गुन्हे जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते. या दाखल गुन्ह्यांपैकी 127 गुन्ह्यांची उकल रायगड पोलिसांनी केली आहे. असे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यात दरोडा , जबरी चोरी , घरफोडी आणि इतर चोर्‍यांमध्ये 677 गुन्हे दाखल झाले होते. त्यापकी 438 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये चोर आणि दरोडेखोरांनी 9 कोटी 96 लाख 8 हजार 124 रुपयांचा मालाची चोरी केल्याचे फिर्यादींमध्ये दाखल केले होते. या गुन्ह्यांची उकल झाल्यामुळे रायगड पोलिसांनी 6 कोटी 64 लाख 82 हजार 19 रुपयांचा मालमत्ता हस्तगत केला आहे. जुगाराच्या अड्ड्यावर 220 ठिकाणी कारवाया केल्या असून तेथून पोलिसांनी 1 कोटी 11 लाख 43 हजार 323 रुपयांचा माल जप्त केला आहे. जिल्ह्यात दारूबंदीच्या 726 कारवाया केल्या असून 67 लाख 16 हजार 573 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध अग्निशस्त्राच्या 9 कारवाया केल्या आहेत. एनडीपीएस अंतर्गत 14 कारवाया कार्नाय्त आहेत. या कारवाईमध्ये 57.470 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 लाख 48 हजार 594 वाहनचालकांवर कारवाई करून 9 कोटी 57 लाख 29 हजार 950 रुपयांचा दंड वसूल केला आहे. असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

Exit mobile version