दोन गुन्ह्यांच्या तपासाबद्दल सन्मान
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात दोन जटिल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास केला होता. त्याबद्दल रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा सन्मान करण्यात आला. कर्जत पोलीस ठाण्यातील वेणगाव येथे गांजा तस्करी सुरु असल्याबाबत तपास कर्जत पोलिसांनी सुरु केला होता. त्यानंतर कर्जत पोलिसांच्या तपास पथकाने अन्य जिल्ह्यात जाऊन तपास करून आरोपींना अटक केले होते. कोणतेही धागेदोरे नसताना कर्जत पोलिसांनी केलेल्या तपासाची दखल रायगड पोलिसांनी घेतली असून बुधवारी (दि.17) अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित क्राईम बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते कर्जत पोलिसांच्या तपास पथकाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सहायक पोलीस निरीक्षक आल्हाट, पोलीस कर्मचारी पाटी, देशमुख, कोळी, चौधरी, जमदाडे यांचा सन्मान करण्यात आला.