ढोल-ताशां, पोवाड्याने जागविला शिवइतिहास
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
दीपावलीच्या उत्साहात पनवेलमधील पेशवेकालीन वडाळे सरोवर परिसरात शिवमय वातावरण अनुभवायला मिळाले. तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागातून ढोल-ताशांचे सामूहिक वादन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाडा आणि ऐतिहासिक प्रसंगांच्या नाट्यमय सादरीकरणाने सरोवर परिसर दुमदुमून गेला. यावेळी तरुणांनी एकत्र येत ढोल-ताशांच्या तालावर सामूहिक वादन सादर केले. या वादनातून निर्माण झालेल्या जोशपूर्ण वातावरणाने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित पोवाड्याचे सादरीकरण करण्यात आले. पोवाड्यातील वीररसपूर्ण शब्दांनी उपस्थितांमध्ये शिवइतिहासाची आठवण जागवली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते पावनखिंडीच्या ऐतिहासिक प्रसंगाचे नाट्यरूप सादरीकरण. बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारा हा प्रसंग तरुण कलाकारांनी प्रभावीपणे उभा केला. या सादरीकरणातून स्वराज्यनिष्ठा, शौर्य आणि त्यागाचा इतिहास जिवंत करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तरुणांच्या कलागुणांना आणि शिवइतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद, पोवाड्याचा वीररस आणि पावनखिंडीचा थरार यामुळे पेशवेकालीन वडाळे सरोवर परिसरात काही काळ शिवकालीन इतिहासाचा अनुभव नागरिकांना घेता आला.
