वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे पकडलेल्या दोन गाड्या घेऊन चोर पसार
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यात मागील आठवड्यात खैरचोरीच्या प्रकरणातून थरारक घटना घडली. वन विभागाने जप्त केलेल्या गाड्या चोरून नेताना चोरट्यांनी चक्क वन समिती अध्यक्ष तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता ताम्हाणे शिर्के परिसरातील जंगलात काही अज्ञात लोक खैर जातीची झाडे तोडत असल्याची माहिती नंदू शिर्के यांनी वन विभागाला दिली. माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक चौबे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली. आरोपींनी घटनास्थळावर आणलेल्या चार गाड्या आणि छाटलेला खैर तेथेच टाकून पलायन केले. वन विभागाने आरोपींच्या गाड्यांचे टायर पंक्चर करून त्या घटनास्थळीच ठेवून दिल्या, मात्र रात्रीच्या वेळी सुरक्षा न ठेवता घटनास्थळ सोडल्याने चोरट्यांना पुन्हा संधी मिळाली. आरोपी गाड्या घेऊन निघाले असताना नंदू शिर्के यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी गाडी वेगाने चालवत थेट शिर्के यांच्या अंगावर घातली. सुदैवाने शिर्के थोडक्यात बचावले. या गोंधळात आरोपींनी चारपैकी दोन गाड्या घेऊन पलायन करण्यात यश मिळवले. या प्रकारामुळे वन विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तालुक्यातील खैर चोरी करणाऱ्यांना मदत करण्यात खामगांब वनविभागाचा मोलाचा वाटा असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख तथा वन समिती अध्यक्ष नंदू शिर्के यांनी केला. त्यांच्याच निष्काळजीमुळे चोरट्यांना गाड्या परत मिळवता आल्या. घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये वन विभागाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.







